Monthly Archives: October 2013

Nani

आज नानी (आईची आई) जाउन 1 वर्ष लोटले.

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामुळे नानी पण स्मृतीतून दूर कुठे तरी लोटली गेलीये. आपण फारच पळतो, नाही का? इतक्या वेगाने पळत राहिलो तर अगदी कालपर्यंतचं सगळंच स्वप्नवत होऊन जाईल. मग “नानी दूर गेली असली तरी नेहमी हृदयात घर करून राहील” हे शब्द पोकळ वाटायला लागतात. स्वतःचाच तिरस्कार वाटतो. सगळं काही सोडून भूतकाळात रमून यावंसं वाटतं.

आणि मग नानी समोर दिसते.

तिची ती गोरीपान कांती. डोक्यावरून घेतलेला पदर. त्या चेहेऱ्यावरचा कमालीचा Confidence. तिचे ते कधीच न झुकलेले खांदे. आणि जणू काय सगळेच भाव डोळ्यात उतरले आहेत इतके बोलके डोळे.

नानीला 5 मुली आणि एक मुलगा. सगळे मिळून आम्ही 16 नातवंड. दर सुट्टीला मामा कडे एकत्र यायचो. फार धमाल यायची. “मामाच्या गावाला जाऊया” ह्या गाण्यातला आनंद आम्ही खरंच अनुभवलाय. हा सगळा अनुभव नानी-नाना मुळे सुंदर झालाय. त्यांनी आम्हाला खूप माया लावली. पण म्हणून फालतू लाड केले नाहीत कि सगळ्याच गरजा भागवल्या नाहीत. त्यांनी कुणासाठी खेळणी किंवा महाग कपडे नसतील आणून दिले कदाचित; पण खूप प्रेम आणि वात्सल्य दिलं. भौतिक गरजा पूर्ण केल्यानेच प्रेमाची सिद्धता होते असं नाही. मी पुण्यात शिकायला आल्यानंतर मला खव्याची पोळी आवडते म्हणून कडत उन्हात बाजारात जाउन खवा आणणारे आणि त्याच्या पोळ्या बनवून खास माझ्यासाठी – त्यांच्या “पतु” साठी पुण्यात पाठवणारे नानी-नाना आठवतात मला.

In a very candid moment at our farm - Nani and Nana (in the background)

In a very candid moment at our farm – Nani and Nana (in the background)

तसं नानीनं एकंदरीत फार खडतर आयुष्य घालवलं – आधी नानासोबत आर्थिक परिस्थितीशी झुंजताना, मग नाना गेल्यावर एकटेपणातून वाट काढताना आणि नंतर Cancer च्या भयंकर आजारावर एकदा मात करून परत त्याच्याशी सामना करत करत शेवटचा श्वास घेताना.

ह्या सगळ्या वाटचालीत नानीची एकंदरीतच लढा देण्याची प्रवृत्ती होती. आपल्यासमोर आलेल्या आर्थिक आणि कौटुंबिक आव्हानांना लढा देण्यासाठी तिला जे काही करता आलं ते तिने केलं. ती झटली. खपली. पण आलेल्या परिस्थितीशी मुकाबला करताना ती कधीच असहाय वाटली नाही. “God helps those who help themselves” हि इंग्रजीतली म्हण तिच्या बाबतीत फार खरी ठरते. नाना गेल्यावर मामा व्यवसायात एकटा पडलेला असताना नानीने घरासोबत व्यवसाय सांभाळण्यातही भक्कमपणे साथ दिली. ती कधीच कर्तव्यपरायण नव्हती. एकीकडे कर्मप्रपंच सांभाळत असताना तिने धर्म आणि अध्यात्मिकता सोडली नाही. जैन धर्मातील मूलभूत तप आणि त्यागमय जीवनाचा तिने अंगीकार केला होता. कर्म आणि धर्म ह्या दोन्ही बाजू तिने ताकदीने सांभाळल्या.

परिस्थितीशी तडजोड करताना नानीने आपल्याला तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून बक्कळ पैसा नसेल तिच्याकडे; पण शेवटपर्यंत ती ताठ मानेने, खंबीर मनाने आणि स्वाभिमानाने जगली. वयाच्या सत्तरीतही स्वतःचं सगळं काम स्वतः करायची. आम्ही आमच्या कामात आळशीपणा केला तर खडे बोल सुनावून तिने आमचे कान पिळलेले आठवतात मला. आजारामुळे शेवटी शेवटी तिला उठणं शक्य नव्हतं. माझी आई, मावशी, मावस भाऊ सचिन, भाभी दिनरात्र तिच्या सेवेत राहिले. पण तिला त्यांना पाणी मागतानाही अवघडल्या सारखं वाटे. स्वाभिमान आणि स्वावलंबनाची अमुल्य शिकवण ती आम्हाला देऊन गेली.

ह्या सगळ्या धडपडीत तिने कसलीही तक्रार केली नाही कि चेहेऱ्यावर तसूभरही करुण भाव येऊ दिले नाहीत. तिने कुठेही कमीपणा वाटून घेतला नाही. तिचं सक्षम मन हे तिचं सगळ्यात मोठं धन होतं. मनाची श्रीमंती एवढी होती कि उलट निरपेक्ष भावनेने ती सगळ्यांच्या मदतीसाठी प्रसंगोप्रसंगी हजर राहिली. मग ते कुणाच्या घरी लग्न कार्य असो, कुणाचा आजार असो कि कुणाच्या घरी मृत्युप्रसंग ओढवल्यास ते घर सांभाळून घेणं असो. गावातल्या कित्येक लोकांच्या मदतीसाठी ती हाकेच्या अंतरावर उभी होती. पण म्हणून कुणाच्याही संसारामध्ये तिने कधीच ढवळाढवळ केली नाही – आपल्या मुलींच्याही नाही. प्रसंगी हवा असणारा आधारच काय तो दिला असेल. एकदा का मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या संसारिक प्रपंचामध्ये आपण लक्ष घालू नये ह्या ठाम मताची ती होती.

आजकालच्या relationships फार “Give & Take” प्रकारच्या झाल्या आहेत. नानीकडे बघितल्यावर कळायचं निरपेक्ष प्रेम आणि निस्वार्थी सेवा काय असते ते. खरा आनंद दुसऱ्यांसाठी झटण्यात आहे ह्याची प्रचीती होते. तिच्या ह्या आदर्शवादी जगण्यामुळेच कि काय – तिला बीड शहरातील जैन संघटनेने “शांतिभूषण” पुरस्काराने सन्मानित केलं.

अशी लोकं आपल्या आयुष्यात होती ह्या विचाराने धन्यता वाटते. आपण अश्या व्यक्तीचे अंश आहोत ह्या जाणिवेने मन गदगदून जातं. आपल्या वडीलधारी लोकांच्या जगण्यातला आदर्शवाद आता कुठे पाहायला मिळेल कि नाही ह्याची चिंता वाटते. मग एक जाणीव होते कि त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचा आणि आदर्शवादी जगण्याचा वारसा आपण पुढे न्यायला हवा. त्यांची शिकवण आणि संस्कार आपण टिकवून ठेवायला हवेत. आपल्याला असे नानी-नाना दिले म्हणून निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आपण एवढे तर करू शकतोच.

आज माया लावणारी, प्रेम करणारी खूप माणसं आहेत जवळ. पण तरी तेवढ्याने राहवेल ते मन कसलं!

ते धावत सुटतं नानी साठी – तिच्या “पतु” ह्या हाकेसाठी, तिने खास बनवलेल्या खव्याची पोळी, गव्हाची खिचडी आणि बेसनासाठी, तिच्या कुशीसाठी, तिच्या मायेने डोक्यावर फिरणाऱ्या हातासाठी. नानी तशी नाहीशी होण्यासारखी नाहीच. पण ती आता आपल्यात नाही ह्या विचाराने जीव कावराबावरा होतो. तिची उणीव भासून मन अस्वस्थ होतं. आणि मग ढळाढळा अश्रू गळायला लागतात…

प्रतीक

Note : I must say I took a lot of inspiration for this post from My Mom’s letter for Nani when she passed away. It was published in local newspapers. Sharing a copy here.

Mom's letter for Nani - published in a local newspaper

Mom’s letter for Nani – published in a local newspaper

Advertisements
%d bloggers like this: